भारताची आफ्रिकेसोबत नव्या वाटचालीस सुरुवात

भारताची आफ्रिकेसोबत नव्या वाटचालीस सुरुवात

पुणे - ‘जागतिक दर्जाची शस्त्रसामग्री परवडणाऱ्या किमतीमध्ये तयार करण्यात भारत कटिबद्ध आहे. तसेच, आफ्रिका खंडाला बदलत्या युगातील लष्करी सामग्री देण्यास संरक्षण क्षेत्रातील भारतीय उद्योग उत्सुक आहे. आफ्रिकेबरोबरच्या नव्या वाटचालीची ही सुरवात आहे,’’ असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले.

पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन येथे गेले दहा दिवस भारत आणि आफ्रिका खंडातील अठरा देशांचा लष्करी सराव सुरू होता. त्याचा समोराप बुधवारी झाला, त्या वेळी रावत बोलत होते. या सरावात चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या सैनिकांचा सन्मानही रावत यांनी केला. सैनिकांनी केलेल्या संचलनाची पाहणी करीत त्यांनी मानवंदना स्वीकारली. तत्पूर्वी, रावत यांच्या उपस्थितीत लष्करी सरावाची प्रात्यक्षिके करण्यात आली.

रावत म्हणाले, ‘‘भारत आणि आफ्रिका यांच्यातील संबंध हे विकासात्मक भागीदारीवर आधारित आहेत. या खंडातील देशांबरोबर संरक्षण सहकार्य राखत भारताने या देशातील लष्करी अधिकाऱ्यांना अनेकवेळा प्रशिक्षण दिले आहे. तसेच, आफ्रिका खंडातील संघर्ष कमी करण्यास संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेअंतर्गत भारताने अनेकवेळा सहभाग दिला आहे. यातून जगात शांतता प्रस्थापित करण्याची देशाची भूमिका प्रतित होते.’’

संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता स्थापित करण्याच्या उपक्रमाअंतर्गत हा लष्करी सराव घेण्यात आला. भूसुरुंग प्रतिबंध प्रशिक्षण, परस्परसहकार्य दृढ करणे तसेच शांतता स्थापित करण्याबरोबरच संघर्षग्रस्त भागातील नागरिकांची सुटका, त्यातील ग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन, यांचे शिक्षण हाच प्रशिक्षणाचा हेतू होता. त्यात प्रत्येक राष्ट्रातील सैनिकांनी चांगली चुणूक दाखविल्याचे रावत म्हणाले.

हल्ला आणि सुटका
शांततेने नांदणाऱ्या गावावर दहशतवाद्यांचा हल्ला होतो. त्यानंतर शांती सेनेतील सैनिक कारवाई करून दहशतवाद्यांचा खातमा करतात. तसेच, गावातील नागरिकांची सुटका करीत जखमींना वैद्यकीय मदत करतात. भारत आणि अठरा देशांतील सैनिकांनी ही नाट्यपूर्ण प्रात्यक्षिके लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या समोर सादर केली. यातून सैनिकांचे दहशतवादविरोधी कौशल्य दाखविण्यात आले. त्यानंतर सैनिकांनी समारोपाच्या संचलनात लष्करप्रमुखांना मानवंदना दिली.

Web Title: Army Training Bipin Ravat Africa

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com